• ‘शोलेतील‘अंग्रेजों के जमाने का जेलर’ काळाच्या पडद्याआड

मुंबई : आपल्या अभिनयाच्या जोरावर कित्येक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते विनोदी अभिनेते असरानी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर गेल्या पाच दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. हिंदी सिनेसृष्टीत एक कसलेला आणि बहुआयामी अभिनेता म्हणून त्यांचा नावलौकिक होता. आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांत विनोदी तसेच इतर भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेल्या काही भूमिका तर आजदेखील अजरामर आणि कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत. त्यांच्या जाण्याने सिनेजगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून असरानी यांची सर्व कामे त्यांचे मॅनेजर बाबूभाई थिबा हेच पाहायचे. त्यांनीच असरानी यांच्या निधनाबाबत माहिती दिली आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना आरोग्य निधी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना फुफ्फुसाशी संबंधित आजार होता, असे बाबूभाई थिबा यांनी सांगितले आहे.

१ जानेवारी १९४१ ला जयपूरमध्ये त्यांचा जन्म झाला. १९६० ला त्यांचे करिअर सुरु झाले. त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. विनोदाचे टायमिंग आणि अनोख्या शैलीमुळे ते लोकप्रिय ठरले. शोले चित्रपटातील त्यांचे ‘अंग्रेजो के जमाने के जेलर’ हा डालयॉग असणारी जेलरची भूमिका लोकप्रिय ठरली. खट्टा मीठा, चुपके चुपके या चित्रपटातील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या.

असरानी यांनी सेंट झेविअर स्कूल, जयपूरमधून शिक्षण घेतल्यानंतर राजस्थान कॉलेजमध्ये पदवी पूर्ण केली. त्यानंतर असरानी यांनी रेडिओ आर्टिस्ट म्हणून काम केले. असरानी यांच्या पत्नीचे नाव मंजू बन्सल इरानी आहे. असरानी यांनी २००४ मध्ये काँग्रेसचे सदस्यत्व घेतले होते. असरानी यांनी सिनेमा क्षेत्रात येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. गुड्डी या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले होते. तो सिनेमा देखील हिट ठरला होता.