बेळगाव / प्रतिनिधी

स्वामी विवेकानंदांनी १६ ऑक्टोबर १८९२ रोजी भारत भ्रमणादरम्यान बेळगावला भेट दिली होती. त्यांचे तीन दिवसांचे वास्तव्य रिसालदार गल्ली येथील भाते यांच्या निवासस्थानी होते. याचे स्मरण करून रामकृष्ण मिशन आश्रमाने स्वामी विवेकानंद स्मारक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

गुरुवार दि. १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत राष्ट्रीय कीर्तीचे कलाकार दामोदर रामदासी यांच्या हिंदी एकपात्री नाटक ‘मर्यादा पुरुषोत्तम राम’ चे सादरीकरण होणार आहे. तसेच, दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी स्मारक भेट देऊन स्वामीजींचे दर्शन घेण्याचे आवाहन केले आहे.

स्मारकात स्वामी विवेकानंदांच्या वास्तव्याशी संबंधित वस्तू जसे की काठी, आरसा, पलंग जतन करून ठेवण्यात आले आहेत. तसेच, त्यांच्या जीवनावर आधारित चित्रांचे विशेष प्रदर्शनही स्मारकात पाहता येणार आहे.