- आरोपी अटकेत
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन पवार (वय २५, रा. चंदगड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपीने गेल्या काही महिन्यांपासून आमदार पाटील यांना मोबाईलवरून अश्लील संदेश आणि व्हिडीओ पाठवत पैशांची मागणी केली होती. त्याने आमदारांकडे तब्बल दहा लाख रुपयांची मागणी केली होती.
या प्रकरणाची दखल घेत आमदार पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आयटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. प्राथमिक तपासानंतर चंदगड पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून, पुढील चौकशीसाठी ठाणे पोलिस पथक चंदगडला रवाना होणार आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.