बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावचा अभिमान ठरलेल्या पैलवान कामेश पाटील यांनी म्हैसूर येथे पार पडलेल्या दसरा कुस्ती स्पर्धेत ‘दसरा कर्नाटक कंटीराव केसरी २०२५’ हा मानाचा किताब पटकावला. त्यांच्या या ऐतिहासिक यशासह इतर दहा युवा पैलवान आणि कर्नाटक राज्य पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवणाऱ्या श्रुती पाटील यांचा सत्कार सकल मराठा समाज, बेळगाव यांच्या वतीने करण्यात आला.
रविवार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता श्री शंभू जत्ती मठ येथे हा गौरव समारंभ पार पडला. यावेळी नुकतेच काडा अध्यक्षपदी निवड झालेले युवराज कदम यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी पोलिस निरीक्षक म्हणून निवड झालेल्या श्रुती पाटील म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षकांचे योगदान मोलाचे असते. शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन दिल्यास आणि विद्यार्थी ते मनापासून आत्मसात केल्यास निश्चित यश मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आज परदेशातही पसरत आहेत, मग आपल्या देशात तसे का घडू नये?” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
तर काडा अध्यक्ष युवराज कदम म्हणाले, समाजातून स्पर्धात्मक परीक्षातून यश मिळून युपीएससी सारखे अधिकारी बनले पाहिजेत, मराठा समाजातील तरुणाई व्यसन आणि मोबाईलच्या जाळ्यात अडकलेली आहे त्यांना परत मार्गावर आणण्याची गरज आहे. समाज म्हणून आपले हे कर्तव्य आहे आणि आपण ते पार पाडले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात किरण जाधव यांनी मराठा समाजातील खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करत पुढील काळात त्यांना आर्थिक सहाय्य देण्याची ग्वाही दिली. अॅड. अमर येळ्ळूरकर यांनी कार्यक्रमाचे स्वागत व उद्देश स्पष्ट करत तरुणांना मोबाईलवर वेळ वाया न घालवता अशा यशस्वी व्यक्तींमधून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
म्हैसूर दसरा कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे पैलवान कामेश पाटील (कंग्राळी खुर्द), प्रेम जाधव (कंग्राळी खुर्द), महेश बिर्जे (तीर्थकुंडये), विनायक पाटील (येळ्ळूर), समर्थ डुकरे (किणये), स्वाती पाटील (कडोली), प्रांजल तुळजाई (अवचारहट्टी), भक्ती पाटील (कंग्राळी), सानिका हिरोजी (आंबेवाडी) आणि अनुश्री चौगुले (अततगा) या सर्वांचा तसेच कर्नाटक राज्य पोलीस उपनिरीक्षक श्रुती पाटील आणि काडा अध्यक्ष युवराज कदम यांचा सत्कार किरण जाधव, प्रकाश मरगळे, गुणवंत पाटील आणि नागेश देसाई यांच्याहस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाला किरण जाधव, शरद पाटील, अॅड. अमर येळ्ळूरकर, महादेव पाटील, नगरसेविका रेश्मा पाटील, समाजसेविका माधुरी जाधव, सुनील जाधव, गुणवंत पाटील आणि नागेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन शरद पाटील यांनी केले.