• हिरेबागेवाडी पोलिसांची धडक कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी

हिरेबागेवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन अट्टल मोटारसायकल चोरांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ४ लाख १० हजार रुपये किमतीच्या सात मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

अटक केलेल्यांची नावे संतोष शिवप्पा उर्फ शिवानंद बेविनकोप्प (३०, रा. इंचल, ता. सौंदत्ती) आणि राजू निंगाप्पा पाटील (३२, मूळ रा. खानापूर, सध्या कॅम्प-बेळगाव) अशी आहेत. या दोघांनी हिरेबागेवाडी पोलीस ठाणे हद्दीत ३, तर शहापूर, माळमारुती, हुबळी व सौंदत्ती पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी १ अशा मिळून सात मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे.

शुक्रवार (१९ सप्टेंबर) रोजी संशयावरून दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून हिरो स्प्लेंडर प्लस (केए 24 एक्स 9661, केए 25 ईके 1568, केए 22 एक्स 2787, केए 22 ईएफ 1093, केए 22 ईडी 0291), हिरो एचएफ डिलक्स (केए 24 एस 2703) आणि हिरो होंडा सीबीझेड (केए 22 ईसी 9825) अशा सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

ही कारवाई बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर बी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. के. होळेन्नावर, उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. आणि त्यांच्या पथकाने केली.