- बेळगावात शेतकरी, व्यापाऱ्यांचे निषेध आंदोलन
बेळगाव / प्रतिनिधी
राज्य सरकारने जय किसान खासगी भाजी मार्केटची परवानगी अचानक रद्द केल्याच्या निषेधार्थ विविध शेतकरी संघटना, व्यापारी व कामगारांनी बेळगावात जोरदार आंदोलन केले.
या मार्केटमधील अंदाजे ३०० दुकानदार आणि कामगार परवाना रद्द झाल्याने अडचणीत सापडले आहेत. दहा वर्षांसाठी देण्यात आलेला ‘ट्रेडिंग लायसन्स’ कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द केल्याने संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी घटनास्थळी येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “संकेश्वरमधील जगद्गुरू शंकरलिंग मार्केटप्रमाणेच काहींच्या दबावामुळे हे मार्केटही बंद करण्याचा प्रयत्न होत आहे. बेळगाव, हुबळी व धारवाड परिसरातील शेतकऱ्यांना जय किसान मार्केट मोठी सोय होती. ए.पी.एम.सी. मध्ये शेतीमाल विकताना अधिक खर्च येतो, त्यामुळे हे मार्केट पुन्हा सुरू झाले तर शेतकऱ्यांचे हित साधले जाईल.”
व्यापाऱ्यांनीही नाराजी व्यक्त करत म्हटले, “सरकारने दहा वर्षांसाठी परवाना देऊनही कोणतीही नोटीस न देता तो रद्द केला. गेली तीन वर्षे आम्ही शेतकऱ्यांना चांगला दर देत आलो आहोत. खासगी मार्केट बंद करून शेतकऱ्यांना ए.पी.एम.सी. मध्येच यावे लागावे असा काहींचा हेतू दिसतो. शिवाय हे मार्केट कोणत्याही शासकीय निधीशिवाय उभारलेले आहे.”
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, “शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी कोणताही दबाव आणला जाणार नाही. खासगी मार्केटचे गेट वा दुकाने सील करण्यात आलेली नाहीत. जय किसान मार्केटच्या पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर कारवाया न करण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. ए.पी.एम.सी.मधील रिकामी दुकाने व्यापाऱ्यांना उपलब्ध करून दिली जातील. कायदेशीर मार्गाने या प्रश्नाचा तोडगा काढला जाईल.”