बेळगाव / प्रतिनिधी

जिद्द, कठोर परिश्रम आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा असेल, तर कोणतेही स्वप्न साकार करणे शक्य आहे. हे बेळगावच्या कॉलेज रोडवरील महिला विद्यालय मराठी माध्यम हायस्कूलची माजी विद्यार्थिनी डॉ. श्रुती श्रीकांत पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतरही आपल्या अधिकारी बनण्याच्या स्वप्नाचा पाठलाग करत त्यांनी कर्नाटक पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, राज्यात नववा क्रमांक पटकावत त्यांनी हे यश संपादन केले आहे.

मूळच्या बेळगाव तालुक्याच्या उत्तर भागातील जाफरवाडी आणि सध्या कंग्राळी येथील मार्कंडेय नगरच्या रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय डॉ. श्रुती श्रीकांत पाटील, सध्या पतीसोबत मुंबईतील वरळी येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून त्यांनी झाले असले तरी, त्यांनी कन्नड भाषेतून परीक्षा देत हे नेत्रदीपक यश मिळवले आहे. यामुळे मराठी भाषिकांसाठी त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे.

श्रुती यांचे शालेय शिक्षण महिला विद्यालय मराठी हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयातून त्यांनी पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले. यानंतर, त्यांनी भरतेश होमिओपॅथिक महाविद्यालयातून बीएचएमएसची पदवी घेतली. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असतानाच त्यांना स्पर्धात्मक परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली. यासाठी बेळगावच्या तत्कालीन जिल्हाधिकारी शालिनी रजनीश यांचा आदर्श आणि वडिलांचा व कुटुंबीयांचा पाठिंबा त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला. त्यांच्या वडिलांचा लाकडावर कोरीव काम करण्याचा व्यवसाय आहे, तर आई सुरेखा गृहिणी असून वडिलांच्या कामात त्यांना मदत करतात. श्रुती यांचे मार्कंडेयनगर येथील एकत्र कुटुंबीय असून वडिलांसोबत काकांचे देखील मोलाचे मार्गदर्शन आणि मदत लाभली आहे.

श्रुती यांचे पतीही वैद्यकीय क्षेत्रातच एमडी असून, त्यांनीही श्रुती यांच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला. श्रुती यांनी २०२० साली झालेल्या पीएसआय परीक्षेसाठी अर्ज केला होता. धारवाड येथे त्यांनी ही परीक्षा दिली. २०२१ साली शारीरिक परीक्षा झाली. त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणत्याही भाषेतून स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवता येते, हा संदेश त्यांच्या यशातून सर्व मराठी तरुणांना मिळाला आहे.