बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील हालभावी येथील आयटीबीपी (इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस) प्रशिक्षण केंद्राला भेडसावणाऱ्या नागरी समस्यांच्या निराकरणासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. वंटमुरी ग्रामपंचायत तसेच संबंधित शासकीय विभागांनी केंद्राला आवश्यक ते सर्व सहकार्य तातडीने द्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले.
आयटीबीपी प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयात गुरुवारी पार पडलेल्या विविध विभागांच्या समन्वय बैठकीत ते बोलत होते. हालभावी परिसरात सुरू असलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याची कामे गतीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. कोणत्याही परिस्थितीत प्रशिक्षण केंद्राला पाणीटंचाई भासू नये, याची दक्षता घेण्याचे आदेश संबंधित कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.
बैठकीत आयटीबीपीचे डेप्युटी जनरल ब्रिगेडियर संदीप झुंझा यांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. दरवर्षी फेब्रुवारी ते जून या कालावधीत केंद्रात तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असल्याने या काळात नियमित पाणीपुरवठा होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याची गंभीर दखल घेत राहुल शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विशेष कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.
आयटीबीपी केंद्र हे राष्ट्रीय महत्त्वाचे असल्याने परिसर स्वच्छ व सुरक्षित राखणे ही वंटमुरी ग्रामपंचायतीची जबाबदारी असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. दररोज कचरा संकलन करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी हालभावी परिसरात घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवावे, असे आदेश त्यांनी दिले.
याच बैठकीत केंद्र परिसरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरही चर्चा झाली. प्रशिक्षणार्थींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले. बैठकीस आयटीबीपीचे कमांडंट सिद्धिक पी. पी., प्रकल्प संचालक रवी बंगारेप्पनवर, उपसचिव बसवराज अडविमठ यांच्यासह विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.








