• अभिनेते हेमंत ढोमे यांची प्रमुख उपस्थिती

बेळगाव : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात पार पडलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेत बेळगाव आणि सीमाभागातील सुमारे ३,००० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत यशस्वी स्पर्धकांचे बक्षीस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार वितरण आणि २०२५ वर्षात १० वी परीक्षेत अव्वल आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक श्री. हेमंत ढोमे उपस्थित राहणार आहेत.

श्री. हेमंत ढोमे यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि गाजत असलेल्या मराठी शाळा विषयावर आधारित क्रांतिज्योती विद्यालय – मराठी मध्यम या चित्रपटासह, फस्टक्लास दाभाडे, झिम्मा, सनी, बघतोस काय मुजरा कर. आदी चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे. त्यांनी ‘क्षणभर विश्रांती’ (२०१०) या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय आणि लेखन प्रवासाला सुरुवात केली. यशस्वी चित्रपटांमुळे त्यांनी मनोरंजन विश्वात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. सामाजिक आणि राजकीय विषयांवर ते कायम समाज माध्यमातून आपली परखड मते मांडत असतात. विशेष करून मराठी शाळा आणि भाषेच्या जागृतीचे कार्य ते करत असतात.

मराठा मंदिर येथे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात ते “अस्तित्व मराठी शाळेचे, संवर्धन मराठी भाषेचे” या विषयावर मार्गदर्शन आणि विद्यार्थी व पालकांशी संवाद साधणार आहेत. मराठी भाषेचा अभिमान जागवण्यासाठी आणि तरुण पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या सोहळ्याला बेळगावमधील मराठी प्रेमींनी, शिक्षकांनी, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी दिनांक: १ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता मराठा मंदिर, बेळगाव येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवा समितीच्या अध्यक्ष अंकुश केसरकर आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.