येळ्ळूर : युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत येळ्ळूर येथील मराठी मॉडेल प्राथमिक शाळा, येळ्ळूरवाडी मराठी प्राथमिक शाळा, चांगळेश्वरी प्राथमिक शाळा आणि पूर्व प्राथमिक शाळा येळ्ळूर (समिती शाळा) येथे मातृभाषेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

  • मॉडेल मराठी प्राथमिक शाळा :

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष जोतिबा उडकेकर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वजन करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष सतीश पाटील यांनी युवा समितीच्या कार्याचे कौतुक केले. तसेच सर्व मराठी भाषिकांनी सुद्धा मराठी भाषेच्या विकासासाठी कटिबद्ध राहून कार्य केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. आपल्या भागातील, गावातील शाळांच्या विकासाकडे सर्वांनी मिळून लक्ष देऊन शाळांना वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मत व्यक्त केले. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली तसेच मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी मराठी शाळा वाचवणे गरजेचे आहे असे सांगितले. यावर्षी तीनशे शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती दिली. तसेच मॉडेल शाळेने आपल्या पटसंख्येमध्ये सातत्य ठेवून वेळवेगळे उपक्रम राबवून आपला तालुक्यात आपला वेगळा नावलौकिक केला आहे त्यामुळे शाळेच्या कमिटीचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र चलवादी, माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश कुगजी, सुरज कुडूचकर, प्रतीक पाटील, रितेश पावले, शुभम जाधव, मूर्तीकुमार माने, चांगदेव मुरकुटे, मारुती यळगुकर, मनोज परीट, जोतिबा पाटील, दिनेश लोहार, दिव्या कुंडेकर, अलका कुंडेकर,प्रियांका सांबरेकर, रेश्मा काकतकर, शुभांगी मुणगेकर शिक्षिका शोभा निलजकर, शिक्षकवृंद पालक आणि विद्यार्थी आदी उपस्थित होते. सहशिक्षिका एम. एस.मंडोळकर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार सातेरी पाखरे यांनी मानले.

  • येळ्ळूरवाडी मराठी प्राथमिक शाळा :

कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे शिक्षक नारायण पाटील हे होते. युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर आणि कार्याध्यक्ष सचिन केळवेकर यांच्याहस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आपले मनोगत मांडताना युवा समितीचा उद्देश हा मराठी शाळा टिकविण्याचा आणि मातृभाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा असून, येळ्ळूर गावामध्ये जसा दर्जा आणि पटसंख्या टिकविण्यात आली आहे त्याचे कौतुक केले. तसेच प्रत्येक गावच्या प्राथमिक शाळेत बालवाडी वर्ग सुरू केल्यास पटसंख्या वाढतील त्यामुळे सर्व शाळांनी यापुढे बालवाडी वर्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यावेळी अध्यक्षीय भाषणात नारायण पाटील यांनी युवा समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि सर्वांनी मिळून शाळा वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी युवा समितीचे खजिनदार विनायक कावळे, शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती आर. आर. पावले आणि इतर शिक्षकवर्ग उपस्थित होते.यावेळी चांगळेश्वरी प्राथमिक शाळा आणि समिती शाळा येथेही साहित्य वितरण करण्यात आले.