बेळगाव / प्रतिनिधी
युवा समिती सीमाभागच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सन्मान करण्यात आला. चळवळीतील दीर्घ अनुभव असलेले हे कार्यकर्ता आज अध्यक्षपदावर आल्यानंतर बेळगावातील मराठी समाजात समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बेळगावमधील अनेक संस्थांचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या तसेच सीमा लढ्याचे न्यायालयीन तसेच रस्त्यावरचे कामकाज सातत्याने पुढे नेत असलेल्या प्रकाश मरगाळेंच्या अध्यक्षपदावर निवडीमुळे सीमालढ्याला नव्या दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. युवा समिती सीमाभागच्या वतीने अध्यक्ष शुभम शेळके यांनी सदिच्छा व्यक्त करत सांगितले की, “हा निर्णय लाखो सीमावासियांना न्याय मिळवण्याच्या लढ्याला बळ देईल.”
मध्यवर्ती समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी आश्वासन दिले की, “सीमालढ्यासाठी मराठी जनता एकजूट दाखवेल आणि योग्य मार्गाने आपला प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करत राहील.”
याप्रसंगी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचीटणीस मनोहर हुंदरे, शिवाजी हावळाणे, अशोक घगवे, मोतेश बारदेशकर, इंद्रजित धामणेकर, रंजित हावळाणे, रमेश माळवी, सुरज जाधव आणि येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








