• सामान्यज्ञान स्पर्धा बक्षिसे, आदर्श शाळा पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने १ मार्च २०२६ रोजी मराठा मंदिर येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध शैक्षणिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सामान्यज्ञान स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव, आदर्श शाळा पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा बहुआयामी सोहळा पार पडणार आहे.

या संदर्भात समितीची बैठक शनिवारी (१४) युवा समिती कार्यालयात अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीच्या प्रारंभी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली.

अध्यक्ष केसरकर यांनी सांगितले की, मागील महिन्यात पार पडलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेत सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील चार गटांतील विजेत्यांना १ मार्च रोजी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच मराठी शाळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बेळगाव व खानापूरमधील पाच शाळांना ‘आदर्श मराठी शाळा’ पुरस्कार जाहीर करण्यात येणार असून यासाठी २१ शाळांनी अर्ज केले आहेत. पुढील आठवड्यात पुरस्कारांची घोषणा होईल.

याशिवाय २०२४-२५ शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये बेळगाव शहर, ग्रामीण व खानापूर विभागातील प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. स्पर्धक, शिक्षक, विद्यार्थी व मराठी भाषिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीने केले आहे.

बैठकीला कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासु सामजी, राजू कदम, खजिनदार विनायक कावळे, किरण हूद्दार, महांतेश आलगोंडी, सुरज कुडुचकर, प्रतीक पाटील, आकाश भेकणे, सौरभ तोंडले, अश्वजीत चौधरी, अक्षय बांबरकर, प्रवीण धामणेकर, निखिल देसाई, आशिष कोचेरी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीकांत कदम यांनी केले.

इयत्ता दहावीमध्ये पहिला, दुसरा किंवा तिसरा क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी सरचिटणीस श्रीकांत कदम (७०१९६६८०२५) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.