बेळगाव : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने रविवार, १ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता मराठा मंदिर येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेत बेळगाव व सीमाभागातील सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात येणार असून ‘आदर्श शाळा पुरस्कार’, ‘ज्ञानज्योती पुरस्कार’ आणि ‘ज्ञानशिखर सन्मान’ पुरस्कारांचेही वितरण करण्यात येणार आहे. तसेच २०२४-२५ शैक्षणिक वर्षातील दहावी परीक्षेत अव्वल ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, लेखक व दिग्दर्शक हेमंत ढोमे उपस्थित राहणार आहेत. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या मराठी शाळांवर आधारित चित्रपटासह ‘फस्टक्लास दाभाडे’, ‘झिम्मा’, ‘सनी’, ‘बघतोस काय मुजरा कर’ आदी चित्रपटांमधील त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते. ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय व लेखन क्षेत्रात पदार्पण केले.
कार्यक्रमात ते “अस्तित्व मराठी शाळेचे, संवर्धन मराठी भाषेचे” या विषयावर मार्गदर्शन करणार असून विद्यार्थी व पालकांशी संवाद साधणार आहेत. या सोहळ्यास मराठी प्रेमी, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.








