बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज युवा समिती कार्यालयात अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर बैठकीत येत्या ६ जानेवारी रोजी आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा निर्णय झाला. यावर्षी सदर स्पर्धा मराठा मंदिर आणि तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन खानापूर रोड येथे संपन्न होणार आहेत. प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालय विभागातून चार गटात स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेला जवळपास ३००० विद्यार्थी येण्याची शक्यता आहे. सीमाभागात मराठी भाषिक विद्यार्थ्यासाठी अशा स्पर्धांच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्याने युवा समितीच्या वतीने ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. यावर्षी या स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे.
तसेच बेळगावमध्ये जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि कन्नड संघटना यांचेकडून वेळोवेळी मराठी भाषिकांना आणि फलकांना लक्ष बनविले जात असून मराठी भाषिकांच्या भाषिक अधिकारांचे रक्षण करावे यासंदर्भात केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाकडे युवा समितीच्या वतीने कित्येकवेळा तक्रार दाखल करण्यात आली असून त्याबाबत अल्पसंख्याक आयोगाकडून सूचना देऊन सुद्धा कोणतीच दखल घेण्यात येत नाही म्हणून त्याची तक्रार राष्ट्रपती आणि गृहमंत्रालयाला करण्यात येणार आहे असे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी सांगितले.
महामेळाव्याला तोंडी परवानगी देऊन सुद्धा महामेळाव्याला आडकाठी आणणाऱ्या प्रशासनाचा निषेध करण्यात आला. आणि अटकेत सुद्धा मराठी बाणा दाखवत महामेळावा यशस्वी केला त्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
यावेळी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, पदाधिकारी विनायक कावळे, सुरज कुडूचकर, राकेश सावंत, प्रतीक पाटील, अश्वजीत चौधरी, आकाश भेकणे, आशिष कोचेरी, कल्याण कुंदे, अक्षय बांबरकर, प्रवीण धामणेकर, रितेश पावले उपस्थित होते. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी आभार मानले.







