• ४ फेब्रुवारीला पुढील सुनावणी

बेळगाव / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य येळ्ळूर येथील फलक आणि त्यावरून उद्भवलेल्या संघर्षासंदर्भातील खटल्याची सुनावणी आज बेळगाव येथील द्वितीय जेएमएफसी न्यायालयात पार पडली. या सुनावणीदरम्यान संबंधित प्रकरणातील आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले असून, न्यायालयाने खटल्याची पुढील सुनावणी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी ठेवली आहे.

या खटल्यातील एकूण १० आरोपींपैकी कुमार परशुराम मासेकर, केदारी रागोजी पाटील, नंदू गोपाळ कुगाजी, राहुल अर्जुन आष्टेकर, नामदेव विठ्ठल कदम, राजू ज्योतिबा नायकोजी, सुधीर परशुराम धामणेकर, जयसिंग यल्लाप्पा आष्टेकर आणि प्रकाश नारायण कुगाजी असे ९ आरोपी न्यायालयात उपस्थित होते.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी क्रमांक २ मनोज लक्ष्मण नायकोजी यांचे यापूर्वीच निधन झाल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲड. शामसुंदर पत्तार आणि ॲड. हेमराज बेंचन्नावर यांनी जोरदार युक्तिवाद मांडला.

येळ्ळूरशी संबंधित एकूण ७ वेगवेगळे खटले दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ४ खटले यापूर्वीच निकाली काढण्यात आले असून उर्वरित खटल्यांची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. आज जबाब नोंदविल्यानंतर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.