येळ्ळूर / वार्ताहर

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार, दि. ८ डिसेंबर रोजी बेळगावात आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यास येळ्ळूरच्या मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने हजर राहण्याचा निर्धार केला आहे. या संदर्भातील नियोजन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीचे अध्यक्षस्थान माजी एपीएमसी सदस्य वामनराव पाटील यांनी भूषविले.

प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी महामेळाव्याचे उद्देश व महत्त्व स्पष्ट केले. २००४ मध्ये महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नाचा कायदेशीर लढा सर्वोच्च न्यायालयात दाखल केला, त्यानंतर २००६ पासून कर्नाटक सरकार बेळगावात अधिवेशन भरवून बेळगाववर हक्क सांगण्याचा प्रयत्न करीत आहे, याला तीव्र विरोध नोंदविण्यासाठी हा महामेळावा असल्याचे सांगण्यात आले.

बैठकीत कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार विभागवार बैठक घेऊन नूतन कार्यकारिणीची पुनर्रचना करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. यावेळी माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दुद्दापा बागेवाडी, युवानेते दत्ता उघाडे, उदय जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य राजू पावले, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष भोला पाखरे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप देसाई, ग्रामीण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष नागेश बोबाटे आदींनी मार्गदर्शन केले.

बैठकीस माजी ता. पंचायत सदस्य चांगदेव परीट, ग्रामपंचायत सदस्य राकेश परीट यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. शेवटी रमेश पाटील यांनी आभार मानले.