येळ्ळूर : येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेने २०२४ मध्ये १५० वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला. या निमित्ताने शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव २६ व २७ एप्रिल २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला होता. या सोहळ्याचा अधिकृत अहवाल प्रकाशन व स्मरणिका वितरण कार्यक्रम अलीकडेच शाळेत आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावजी महादेव पाटील होते. विद्यार्थ्यांच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. एसडीएमसीच्या विद्यमान अध्यक्षा दिव्या संदीप कुंडेकर तसेच माजी अध्यक्षा रुपा श्रीधर धामणेकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष एन. डी. गोरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

शाळेतर्फे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष रावजी पाटील, निधी संकलन समितीचे अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, स्मरणिका समितीचे अध्यक्ष बी. बी. कानशिडे, प्रा. आनंद मेणसे, पत्रकार कृष्णा शहापूरकर, अशोक देसाई, महोत्सव समितीचे सचिव तथा मुख्याध्यापक राजेंद्र चलवादी आणि सहशिक्षक सातेरी पाखरे यांचा सत्कार करण्यात आला.

प्रमुख अतिथी प्रा. आनंद मेणसे यांच्या हस्ते महोत्सव अहवालाचे प्रकाशन व स्मरणिकेचे वितरण झाले. यानंतर वरिष्ठ मुख्याध्यापक आर. एम. चलवादी यांनी अहवालाचे वाचन केले. प्रा. आनंद मेणसे, कृष्णा शहापूरकर, एन. डी. गोरे आणि आनंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बी. बी. कानशिडे यांनी प्रास्ताविकातून महोत्सवाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या संकल्पांची माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात रावजी पाटील यांनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदारांचे आभार मानले. या कार्यक्रमाला एसडीएमसी उपाध्यक्ष जोतिबा उडडेकर, सदस्य मूर्तिकुमार माने, मारुती यळगुकर, दिनेश लोहार, जोतिबा पाटील तसेच अलका कुंडेकर, मयुरी कुगजी, रेश्मा काकतकर, राजश्री सुतार, शुभांगी मुतगेकर, अर्चना देसाई, ज्योती पाटील यांसह महोत्सव समितीचे सदस्य शिवाजी नांदुरकर, नारायण बस्तवाडकर, दशरथ पाटील, अशोकराव विठ्ठलराव देसाई, सुनील हलगेकर, शंकर टक्केकर, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतिथींचे स्वागत व सत्कार श्रीमती एस. आर. निलजकर यांनी केले. सूत्रसंचालन एस. बी. पाखरे यांनी तर आभार प्रदर्शन सी. एम. कर्लेकर यांनी केले. महोत्सवाचा अहवाल व स्मरणिका शाळेत उपलब्ध असून देणगीदार व शिक्षणप्रेमींनी शाळेला भेट देऊन ती स्वीकारावी, असे आवाहन महोत्सव समितीने केले आहे.