- सीआरपीएफ व सीआयएसएफमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा शाळेत सन्मान
येळ्ळूर : भारतीय सीआरपीएफ व सीआयएसएफ पोलीस सेवेत निवड झालेल्या येळ्ळूर येथील मराठी मॉडेल शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या एस.डी.एम.सी. अध्यक्षा दिव्या संदिप कुंडेकर होत्या.
यावेळी सीआरपीएफ व सीआयएसएफमध्ये निवड झालेल्या कु. अक्षता अनिल पाटील, कु. तन्वी भाऊराव पाटील व कु. साहिल शंकर पाटील यांचा तसेच त्यांच्या पालकांचा शाळेच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक राजेंद्र चलवादी यांनी केले. सत्कारानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सध्याच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, शिस्त, कठोर परिश्रम व देशसेवेचे महत्त्व याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
एस.डी.एम.सी. उपाध्यक्ष जोतिबा यल्लाप्पा उडकेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात दिव्या संदिप कुंडेकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत शाळेतील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊन उज्ज्वल यश संपादन करतील, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका एम. एस. मंडोळकर व सहशिक्षक सातेरी पाखरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन सहशिक्षिका सौ. मेघा देसाई यांनी केले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मूर्तीकुमार माने, मारुती यळगुकर, शशिकांत पाटील, दिनेश लोहार, विजय धामणेकर, चांगदेव मुरकुटे, सदस्या अलका कुंडेकर, शुभांगी मुतगेकर, माधुरी कुगजी, रेश्मा काकतकर, अर्चना देसाई, ज्योती पाटील यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








