बेळगाव : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी आयोजित मराठी सन्मान यात्रा यशस्वी करण्यासाठी येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने सक्रिय सहभागाचा निर्धार व्यक्त केला. दत्त मंदिर येथे झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य गोविंद बापूसाहेब पाटील होते. प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करत युवकांनी सीमाप्रश्न सुटेपर्यंत संघटित राहून समितीच्या झेंड्याखाली कार्य करण्याचे आवाहन केले.
रमेश पाटील यांनी श्री दत्त भजनी मंडळ व पाटील गल्ली भजनी मंडळाने शिवरायांची राजधानी किल्ले रायगड येथे जाऊन सीमाप्रश्नाचा जागर केल्याचा उल्लेख केला. रायगडाच्या इतिहासात प्रथमच भजनी मंडळाने भेट दिल्याचा मान येळ्ळूरला मिळाल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.
वामनराव पाटील यांनी गेल्या तीन ते साडेतीन दशकांतील समितीच्या कार्याचा आढावा घेत एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या त्यागातून महाराष्ट्रात जाण्याचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास व्यक्त केला. माजी उपाध्यक्ष दुद्दापा बागेवाडी यांनी येळ्ळूरची जनता समितीच्या ध्येयधोरणांशी निष्ठावान राहील, अशी ग्वाही दिली.
बैठकीत पूर्व भागातील संघटना बळकटी, स्थानिक समस्या व युवकांच्या सहभागाबाबत चर्चा झाली. दत्ता उघाडे, बी.एन. मजुकर, राजू पावले, सुरज गोरल, गणेश अष्टेकर आदींनी विचार मांडले.
यावेळी चांगदेव परीट, सतीश धामणेकर, विलास पाटील, राकेश परीट, राजाराम हुंदरे, मारुती शहापूरकर, अजित शहापूरकर, गजानन कुंडेकर, विनोद कुंडेकर, कृष्णा शहापूरकर, सचिन कुंडेकर, बाळू कुंडेकर, प्रवीण कंग्राळकर, उत्तम खनगावकर, विठ्ठल लोहार, राहुल कुगजी, लक्ष्मण कुंडेकर, आकाश नायकोजी, विजय पाटील, संतोष नायकोजी, तुषार सांबरेकर, प्रकाश पाटील, शिवाजी कदम, सतीश देसुरकर, दयानंद उघाडे, नेताजी गोरल, यल्लुपा पाटील, प्रकाश मालुचे आदी उपस्थित होते. शेवटी म्हात्रू लोहार यांनी आभार मानले.








