• विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांची अधिकाऱ्यांना सुचना

बेळगाव / प्रतिनिधी

आगामी ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपापल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात, कोणताही गैरप्रकार होऊ देऊ नये, अशा स्पष्ट सूचना विधानसभेचे अध्यक्ष यू.टी. खादर यांनी दिल्या.

सुवर्ण विधान सौध येथे बुधवार (दि. १९) नोव्हेंबर रोजी झालेल्या अधिवेशनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. दि. ८ ते २० डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या अधिवेशनासाठी नियुक्त सर्व अधिकाऱ्यांनी पूर्ण निष्ठा आणि समन्वयाने काम करून अधिवेशन सुरळीत पार पाडावे, असे त्यांनी सांगितले.

यू. टी. खादर पुढे म्हणाले की, “अधिवेशनादरम्यान कोणतीही समस्या उद्भवल्यास ती तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणा आणि विलंब न करता सोडवा. दूरसंचार, इंटरनेट, संगणक व्यवस्था यांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही याची विशेष काळजी घ्या.”

त्यांनी आंदोलकांसाठी निश्चित जागा, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे अशा आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचेही निर्देश दिले. सुवर्ण विधानसौध भोवतालच्या वाहतुकीसाठी सक्षम पोलिस सुरक्षा आणि वाहतूक नियोजन करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. नागरिकांच्या सोयीसाठी हेल्पलाईन केंद्र सुरू करण्याचे आणि यावर्षीही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे त्यांनी सुचवले. अधिवेशन पाहण्यासाठी येणाऱ्या जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी निश्चित वेळ उपलब्ध करून द्यावी, असेही ते म्हणाले.

  • मंत्री, आमदारांसाठी निवास – वैद्यकीय सुविधा : बसवराज होरट्टी

विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी मंत्री, आमदार, तसेच मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी योग्य निवास व्यवस्था आणि वाहतुकीची सोय करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, ज्या हॉटेलमध्ये मंत्री आणि आमदार राहतील तेथे तज्ज्ञ डॉक्टरांचा ताफा तैनात करण्यात यावा. त्याचप्रमाणे सुवर्ण विधान सौधमध्येही सुसज्ज रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक उपलब्ध ठेवावे.

बसवराज होरट्टी यांनी पुढे सांगितले की, राणी चन्नम्मा विद्यापीठ, कर्नाटक विद्यापीठ आणि अक्कमहादेवी विद्यापीठातील निवडक ३० विद्यार्थ्यांच्या गटांना विधिमंडळाची कामकाज पद्धती समजण्यासाठी विशेष वेळ देण्यात येईल.

  • जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग सज्ज :

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यावर्षीच्या हिवाळी अधिवेशनासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी गेल्या वर्षाप्रमाणे यावेळीही १२ समित्या स्थापन केल्या असून संबंधितांना त्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या आहेत.” पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनीही अधिवेशन कालावधीसाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगितले. अतिरिक्त पोलिस दलाची मागणी करून त्यांची निवास व भोजन व्यवस्था करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला विधानसभेचे उपाध्यक्ष रुद्रप्पा लमाणी, आमदार राजू (आसिफ) सेठ, विधानसभा सचिव आर. विशालक्षी, विधान परिषद सचिव महालक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.