बेळगाव : कर्नाटकचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव विजय गोरे यांचा येथील सुप्रसिध्द विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. गोरे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बेळगावात आले असता एका खासगी हॉटेलमध्ये शनिवारी त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रारंभी व्हाईस चेअरमन प्रा. दत्ता नाडगौडा यांनी प्रास्ताविक व स्वागत करताना गोरे यांच्या कार्याचा गौरव केला. अत्यंत गरिबीत कष्टाने व जिद्दीने उच्च शिक्षण घेऊन राज्याच्या प्रशासकीय सेवेत सर्वोच्च पदापर्यंत त्यांनी मजल मारली, असे सांगितले.

यानंतर चेअरमन कुमार पाटील यांच्याहस्ते शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गोरे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व सोसायटीस शुभेच्छा व्यक्त केल्या. गोरे हे मूळचे बेळगावचे असून त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठी शाळा क्रमांक २ मध्ये, माध्यमिक शिक्षण बेननस्मिथ हायस्कूल व उच्च शिक्षण आरएलएस व जीएसएस कॉलेजमध्ये झाले. त्यांनी लष्करात कॅप्टन म्हणून सेवा बजावली. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांचा सहभाग होता. त्यानंतर आयएएस अधिकारी म्हणून विविध उच्च पदावर त्यांनी काम केले. सध्या ते फिन्स या देशसुरक्षेसंबंधी एनजीओचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. पैशा‌विना गरीब होतकरु विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून बेळगावातील पाच शाळांना ते गेल्या अनेक वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या रुपाने मदत करीत आहेत.

कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सदानंद सामंत, बुलकचे किशोर काकडे, अन्य पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.