बेळगाव / प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या मिस्टर युनिव्हर्स २०२५ स्पर्धेसाठी बेळगावच्या विनोद पुंडलिक मेत्री यांची निवड झाली असून, शहरासाठी हा एक मानाचा क्षण ठरला आहे. जर्मनी येथे होणाऱ्या या जागतिक स्पर्धेत बेळगावचा एक तरुण सहभागी होत असल्याने शहरभरातून अभिनंदनाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
विनोद मेत्री यांचा जन्म अनगोळ येथील पुंडलिक मेत्री यांच्या घरी झाला. त्यांच्या वडिलांनी मुलाच्या प्रत्येक निर्णयाला उत्साहाने पाठिंबा दिला. विनोदच्या यशामागे त्यांचे प्रोत्साहन आणि कुटुंबीयांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे नातेवाईक सांगतात.विनोदने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अनगोळ येथील संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी आरपीडी कॉलेजची निवड केली आणि तिथे ते “आरपीडी श्री” हा मानाचा किताब पटकावण्यात यशस्वी झाले. तसेच महाविद्यालयीन स्तरावर युनिव्हर्सिटी ब्लू म्हणून उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. शरीरसौष्ठव खेळात प्रवेश केल्यानंतर विनोदने प्रशिक्षक राजेश लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण मेहनत घेतली. स्थानिक ते राज्यस्तरापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या या यशामुळेच स्पोर्ट्स कोट्यातून त्यांची भारतीय लष्करासाठी निवड झाली.
भारतीय सैन्यात भरती झाल्यानंतर विनोद मेत्री यांनी बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये हवालदार पदावर जबाबदारी स्वीकारली आहे. सैन्य सेवेसोबतच शरीरसौष्ठव क्षेत्रातील आवड कायम ठेवत त्यांनी मिस्टर युनिव्हर्ससारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत प्रवेश मिळवला.विनोदच्या यशस्वी प्रवासात बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन अॅण्ड स्पोर्ट्सचे पदाधिकारी, तसेच SSS फाउंडेशनचे संजय सुंठकर, मिहिर पोतदार आणि महेश सातपुते यांचे मार्गदर्शनही अत्यंत मोलाचे ठरले आहे. जागतिक पटलावर बेळगावचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने स्थानिक नागरिक, क्रीडाप्रेमी आणि प्रशिक्षक वर्गाकडून विनोद मेत्री यांना शुभेच्छांचा वर्षाव होत असून, मिस्टर युनिव्हर्स 2025 मध्ये ते उज्ज्वल यश मिळवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








