- मोबदला न दिल्याने सरकारी गाडी जप्त
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील सांबरा येथील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून मोबदला न दिल्याने प्रशासनाची मोठी नामुष्की झाली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी बेळगाव उपविभागीय अधिकाऱ्यांची सरकारी गाडी तसेच कार्यालयातील संगणक जप्त करण्यात आले.
सन २०१० मध्ये विमानतळाच्या विकासासाठी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र, १६ वर्षे उलटूनही शेतकऱ्यांना कोणताही मोबदला देण्यात आलेला नव्हता. यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली होती.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत बेळगाव तिसरे दिवाणी न्यायालय यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले. यानुसार ही कारवाई करण्यात आली.
याबाबत माहिती देताना वकील एस. एस. शेट्टर यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वीच न्यायालयाने सहा शेतकऱ्यांना तातडीने मोबदला देण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, प्रशासनाने त्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याने अखेर जप्तीची कारवाई करावी लागली. या घटनेमुळे भूसंपादन प्रकरणातील प्रशासनाच्या दिरंगाईवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.








