विजयपूर / दिपक शिंत्रे

विजयपूर जिल्ह्याच्या सिंदगी तालुक्यातील रामपूर परिसरात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एक रेकॉर्डवरील गुन्हेगार ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मृताचे नाव युनूस इक्लास पटेल (वय ३५) असे असून, तो अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉंटेड होता.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, युनूसने काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीस चाकू दाखवून २५ हजार रुपये लुटले आणि त्याच्याकडील स्कूटर घेऊन फरार झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली होती.

दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली की युनूस आपल्या देवनगाव (ता. आलमेल) या गावाकडे जात आहे. त्यावरून पोलिसांनी रामपूरजवळ सापळा रचला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, युनूसने चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने दोन पोलीस कर्मचारी आणि इन्स्पेक्टर प्रदीप तळकेरी यांच्यावर झेप घेतली.

स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी प्रथम हवेत गोळी झाडली. मात्र, तो न थांबल्याने इन्स्पेक्टर तळकेरी यांनी त्याच्या पायावर गोळी झाडली. गंभीर जखमी झालेल्या युनूसला सिंदगी तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

युनूस पटेलवर दोन खून, एक खुनाचा प्रयत्न आणि इतर मिळून १२ गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेची सखोल चौकशी सुरू असून, जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.