हिंडलगा / वार्ताहर

बेळगाव येथील विजयनगर हिंडलगा येथे माजी खासदार मंगला सुरेश अंगडी यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या बस थांब्याचे लोकार्पण मंगळवारी पार पडले.
माजी खासदार मंगला सुरेश अंगडी यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना त्यांनी विजयनगरच्या रहिवाशांनी या बस थांब्याचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमात बोलताना बेळगाव ग्रामीण भाजपचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले की, हा बस थांबा अनेक वर्षांपासून विजयनगरच्या रहिवाशांचे स्वप्न होते. दिवंगत अजित हलकर्णी आणि मिथुन उसूलकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे या बस थांब्याचे आज उद्घाटन होत आहे. हे स्थानक दिवंगत अजित हलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उद्घाटित करण्यात आले. एका भाजप कार्यकर्त्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी हिंडलगा ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर, नागेश मन्नोळकर, लक्ष्मी परमेकर, मिथुन उसूलकर, लता उसूलकर, भाग्यश्री कोकितकर, हलकर्णी परिवार, विलास तहसीलदार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.