- राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना
बेळगाव / प्रतिनिधी
माजी खासदार, माजी मंत्री आणि दावणगेरे दक्षिणचे ज्येष्ठ आमदार शामनूर शिवशंकरप्पा यांच्या निधनाबद्दल सोमवारी सकाळी विधान परिषदेत शोक व्यक्त करण्यात आला. सभापती बसवराज होरट्टी यांनी शोक प्रस्ताव मांडला. यावेळी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील सदस्यांनी शिवशंकरप्पा यांच्या निधनामुळे कर्नाटकाने एक अजातशत्रू, साधा-सज्जन आणि सर्वसमावेशक नेता गमावल्याची भावना व्यक्त केली.
शोक प्रस्ताव मांडताना सभापती होरट्टी यांनी सांगितले की, १६ जून १९३१ रोजी दावणगेरे येथे जन्मलेल्या शामनूर शिवशंकरप्पा यांनी इंटरमिजिएटपर्यंत शिक्षण घेतले होते. मूळचे व्यापारी असलेल्या शिवशंकरप्पा यांनी १९६९ मध्ये दावणगेरे नगर परिषदेचे सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला. १९७१ मध्ये त्यांनी नगर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.
दावणगेरे — ‘कर्नाटकचे मँचेस्टर’ — येथे त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभारून हजारो विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय व उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. शिक्षण क्षेत्रासोबतच त्यांनी अपंग आशाकिरण ट्रस्ट, स्पोर्ट्स क्लब, बापूजी इंजिनिअरिंग असोसिएशन यांसारख्या अनेक सामाजिक संस्थांची स्थापना केली. अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ नेतृत्व केले.
शामनूर शिवशंकरप्पा हे १९९४ मध्ये प्रथम दावणगेरे विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर २००४, २००८, २०१३, २०१८ आणि २०२३ मध्ये ते आमदार राहिले. त्यांनी कृषी, पणन व फलोत्पादन मंत्री म्हणून जबाबदारीने काम केले. १९९८ मध्ये ते लोकसभेचे सदस्यही होते. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, धार्मिक आणि औद्योगिक क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे सदस्यांनी नमूद केले.
त्यांना भारत गौरव पुरस्कार, शिरोमणी विकास इंदिरा प्रियदर्शिनी पुरस्कार, विद्याश्री सेवा पुरस्कार, सिरिगेरे तारालाबालु मठाचा धर्मचूडामणी सन्मान, इंटरनॅशनल ग्लोबल पुरस्कार यांसह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले होते.
या शोक प्रस्तावावर मंत्री भोसराजू, विरोधी पक्षनेते चालवादी नारायणस्वामी, ऊर्जा मंत्री के. जे. जॉर्ज, उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर, अन्न व नागरी व्यवहार मंत्री मुनियप्पा, तसेच सी. टी. रवी, इवान डिसोझा, प्रदीप शेट्टर, मंजुनाथ भंडारी यांच्यासह अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यानंतर एक मिनिट स्तब्धता पाळून विधान परिषदेच्या वतीने शामनूर शिवशंकरप्पा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निधनाच्या शोकार्थ विधान परिषदेचे काम दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.








