- विनोदी अभिनयाचा बादशहा हरपला !
- बॉलिवूडला दुसरा मोठा धक्का
मुंबई / प्रतिनिधी
हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील लोकप्रिय विनोदी अभिनेता सतीश शाह (वय ७४) यांचे शनिवारी दुपारी मूत्रपिंडाच्या विकारामुळे निधन झाले. सतीश शाह यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सतीश शाह यांनी आपल्या विनोदी शैलीच्या अभिनयाने चित्रपट आणि टेलिव्हिजन दोन्ही माध्यमांमध्ये प्रेक्षकांचा मन जिंकले. त्यांनी फिल्म टेलीव्हिजन इन्स्टिट्यूटमधून अभिनय शिक्षण पूर्ण केले आणि १९७० च्या दशकात चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९७८ साली सईद अख्तर मिर्झा दिग्दर्शित ‘अरविंद देसाई की अजीब दास्तान’ चित्रपटातून त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारली.
त्यांना खरी ओळख मिळाली कुंदन शाह दिग्दर्शित ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटातून. त्यानंतर ‘उमराव जान’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’, ‘कभी हाँ कभी ना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला.
सतीश शाह यांचे टीव्हीवरील योगदानही उल्लेखनीय होते. ‘यह जो है जिंदगी’, ‘घर जमाई’, ‘फिल्मी चक्कर’ या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला. मात्र सर्वाधिक लोकप्रियता ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मालिकेतील इंद्रवर्धन या भूमिकेमुळे मिळाली. त्यांच्या सहज विनोदी अभिनयाने आणि बहुविध व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटवला.
हिंदी मालिका-चित्रपटसृष्टीत सहज विनोदी अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अगदी मोजक्या कलाकारांपैकी एक असलेल्या सतीश शाह यांचे जाणे त्यांच्या सहकलाकारांना आणि चाहत्यांनाही चटका लावून जाणारे ठरले आहे.







