बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथील विद्यार्थी वेदांत आनंद मिसाळे याने ६९ व्या एस.जी.एफ.आय नॅशनल्स स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत सुवर्णपदकासह राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला आहे.
सीबीएसई शाळेचे प्रतिनिधित्व करताना वेदांतने ४x१०० मीटर मेडले रिले प्रकारात सुवर्ण पदक पटकावत देशभरात बेळगाव व महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले. विशेष म्हणजे, त्याच्या संघाने ४:२०:६० मिनिटांची वेळ नोंदवत जुना ४:२५:४५ मिनिटांचा विक्रम मोडून नवीन राष्ट्रीय विक्रम स्थापित केला आहे.
या स्पर्धेत वेदांतने महत्त्वपूर्ण असलेल्या १०० मीटर बटरफ्लाय स्ट्रोकमध्ये प्रभावी प्रदर्शन करीत विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या ऐतिहासिक यशामुळे ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण आहे.
वेदांतचे हे यश सततचे कठोर परिश्रम, समर्पण आणि उत्कृष्ट जलकौशल्य यांचे फलित असल्याचे मान्यवरांनी गौरवले आहे. शाळेच्या एस.डी.एम.सी.चे चेअरमन व ज्योती कॉलेजचे निवृत्त प्राचार्य आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रा. आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रा. नितीन घोरपडे, सल्लागार संचालिका श्रीमती. मायादेवी अगसगेकर व मुख्याध्यापिका श्रीमती.सोनाली कंग्राळकर यांनी वेदांतचे अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.








