• शाळा-कॉलेजच्या प्रशासनांना पत्र  : शैक्षणिक संस्थेच्या आवारातच वाहने पार्क करण्याची सूचना

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहर व उपनगरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी पोलीस आयुक्त शाळा कॉलेजचे मुख्याध्यापक व प्राचार्यांना पत्र पाठवले आहे. शैक्षणिक संस्थाबाहेरील पार्किंगला शिस्त लावण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

२ ऑगस्ट रोजी पोलीस अध्यक्षतेखाली आयुक्तांच्या शहरातील शाळा-कॉलेजचे व्यवस्थापक व प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची बैठक घेण्यात आली होती. वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी आयुक्तांनी त्यांच्याशी चर्चा करतानाच सल्ला मागितला होता.

विद्यार्थ्यांची वाहने शाळा-कॉलेजच्या आवारातच उभी करण्यासंबंधी प्रमुख सल्ला या बैठकीत आला. त्यामुळे मुख्याध्यापक व प्राचार्यांना पत्र पाठवण्यात आले आहे.मटका, जुगार, अमलीपदार्थांविरुद्ध कारवाईचा सपाटा सुरू ठेवतानाच पोलीस आयुक्तांनी वाहतुकीला शिस्त लावण्याचा उपक्रमही हाती घेतला आहे. अनेक ठिकाणी शाळा- कॉलेजमध्ये पार्किंगसाठी जागा असूनही विद्यार्थी शिक्षण संस्थांबाहेर आपली वाहने उभी करतात. त्यामुळे यापुढे विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांच्या आवारातच उपलब्ध असलेल्या जागेत आपली वाहने उभी करण्यासाठी प्रेरित करण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी आपल्या पत्रात केली आहे.

पार्किंगच्या ठिकाणाऐवजी रस्त्यावर वाहने उभी केल्यास होणारी गैरसोय टाळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. काही शिक्षण संस्थाचालकांनी जवळच असलेल्या खाली जागा पार्किंगसाठी सुचवल्या आहेत. संबंधित जमीन मालकांशी चर्चा करून ही जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून घेण्यासंबंधी प्रयत्न सुरू असल्याचेही पोलीस आयुक्तांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

पीयुसीत शिकणारे किंवा अठरा वर्षांखालील विद्यार्थी दुचाकी घेऊन शाळा-कॉलेजला येत आहेत. हा विषय गंभीर आहे. याकडे पोलीस आयुक्तांनी शिक्षण संस्थाचालकांचे लक्ष वेधले आहे. भारतीय मोटर वाहन कायदा सेक्शन ४ अनुसार वाहने चालविण्यासाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आहे. याबरोबरच सेक्शन १९९-ए अन्वये अल्पवयीन मुलांनी चुका केल्या तर वाहनमालक व पालकांना तीन वर्षे कैद व २५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. १८ वर्षांखालील मुले वाहने चालविणे दंड व शिक्षेस पात्र ठरणार आहे. त्यामुळे ही गोष्ट विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याची सूचनाही पोलीस आयुक्तांनी आपल्या पत्रात केली आहे. २ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत काही शिक्षण संस्थाचालकांनी आपल्या संस्थेतील सुरक्षारक्षकांना वाहतूक विषयक प्रशिक्षण देण्याची मागणी केली आहे. यासाठी पोलीस दलाची तयारी असल्याचे सांगतानाच आयुक्तांनी शिक्षण संस्थाचालक विद्यार्थ्यांबरोबरच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी बेळगावकरांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

  • सायलेन्सर मॉडीफाय करून देणाऱ्या गॅरेजमालकांनाही नोटिसा पाठविणार : 

अनेक शिक्षण संस्थाबाहेर किंवा शहरातील इतर ठिकाणी सायलेन्सर मॉडीफाय करून कर्कश आवाज केला जात असल्याचे आढळून आले आहे. कर्कश आवाजाचे सायलेन्सर असणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला असून सायलेन्सर मॉडीफाय करून देणाऱ्या गैरजमालकांनाही नोटिसा पाठविण्यात येतील, असे सांगितले आहे. यावरून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सर्व पर्यायांचा विचार सुरू केला आहे, हे स्पष्ट होते.