बेळगाव / प्रतिनिधी

देव, देश आणि धर्म रक्षणाचा संदेश देणारी श्री दुर्गामाता दौड आज वडगाव परिसरात मोठ्या उत्साहात पार पडली.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित नवरात्रौत्सवातील पाचव्या दिवसाच्या दौडीची सुरुवात खासबाग येथील बसवेश्वर चौकातील दुर्गा देवी मंदिरात आरतीने झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रेरणा मंत्राने दौडीला प्रारंभ झाला. गल्लोगल्ली दौड येताच नागरिकांनी औक्षण करून हार्दिक स्वागत केले.

ही दौड भारतनगर पहिला क्रॉस, नाथ पै सर्कल, डबल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, मरगम्मा मंदिर रोड, भारतनगर ४ था ते ६ वा क्रॉस, रयत गल्ली, सपार गल्ली, सोनार गल्ली रोड, मरगाई मंदिर रोड, तेग्गीन गल्ली, जुने बेळगाव रोड, गणेशपेठ, कुलकर्णी गल्ली, कोरवी गल्ली, संभाजी गल्ली, लक्ष्मी मंदिर, चावडी गल्ली, रामदेव गल्ली, येळ्ळूर रोड, नाझर कॅम्प, हरिमंदिर मंदिर रोड, वझे गल्ली, धामणे रोड, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, आनंदनगर, पाटील गल्ली, संभाजीनगर मार्गे वडगावातील ग्रामदैवत श्री मंगाई मंदिरात दाखल झाली.

तेथे श्री मंगाई देवीची महाआरती झाल्यानंतर ध्येयमंत्र म्हणत ध्वज उतरविण्यात आला आणि पाचव्या दिवसाच्या दौडीची सांगता झाली. या दौडीत युवक-युवती हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.