- बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची शरद पवारांकडे मागणी
कोल्हापूर : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रतिनिधींनी आज कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची हॉटेल पंचवटी येथे भेट घेऊन सीमा प्रश्नावर सविस्तर चर्चा केली.
सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्नाच्या दाव्याची २१ जानेवारी २०२५ रोजी सुनावणी ठरलेली असल्याने, मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची बैठक तातडीने बोलवावी, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. यावेळी पवार म्हणाले की, “आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरला येणार आहेत. त्यांच्याशी मी याबाबत बोलणार आहे.” मात्र श्री. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री मुंबईला रवाना झाल्याने त्यांच्याशी संवाद साधता आला नाही.
त्यानंतर समितीच्यावतीने कार्यक्रमस्थळीच पवार यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, सीमाप्रश्नाबाबत उच्चाधिकार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी विशेष लक्ष द्यावे, तसेच सर्वोच्च न्यायालयात दावे हाताळणाऱ्या वकिलांशी नियमित चर्चा करावी, अशी विनंती करण्यात आली.
कोल्हापूरमध्येच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही समितीने निवेदन सादर केले. उच्चाधिकार समितीची बैठक तातडीने घेण्यासाठी प्रयत्न करावेत आणि सर्वोच्च न्यायालयातील वकिलांशी सातत्याने संपर्क ठेवून सुनावणी लवकर व्हावी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रतिनिधींनी केली. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
या शिष्टमंडळात समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, नेताजी जाधव, महेश जुवेकर, दत्ता उघाडे, सुनील आनंदाचे, मारुती मरगानाचे तसेच खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, उपाध्यक्ष गोपाळराव पाटील, सरचिटणीस आबासाहेब देसाई, संजय पाटील, पांडुरंग सावंत आदी सदस्यांचा समावेश होता.








