बेळगाव / प्रतिनिधी

हुबळीतील प्रसिद्ध एम. एम. जोशी आय इन्स्टिट्यूट व बेळगावातील डॉ. कोडकणीज आय सेंटर यांच्या संयुक्त सहकार्यातून “युनायटेड फॉर व्हिजन” या नव्या उपक्रमाची सुरुवात येत्या ५ ऑक्टोबर रोजी बेळगावात होणार आहे. याबाबत माहिती कोडकणीज आय सेंटरच्या वैद्यकीय संचालिका डॉ. शिल्पा कोडकणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. कोडकणी यांनी सांगितले की, पूर्वी मोतीबिंदू पूर्ण पिकल्याशिवाय शस्त्रक्रिया केली जात असे. परंतु आता अत्याधुनिक यंत्रणेमुळे रुग्णाला प्रतीक्षा करावी लागत नाही. तसेच मायक्रो पल्स लेझर तंत्रज्ञानामुळे काचबिंदू शस्त्रक्रिया अधिक सोपी आणि रुग्णासाठी कमी त्रासदायक ठरत आहे. डोळ्यांच्या आजारांवर वेळेवर उपचार घेणे महत्त्वाचे असून, उपचार महाग असल्याचा गैरसमज करून रुग्णांनी दुर्लक्ष करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. आर. कृष्णप्रसाद (एम. एम. जोशी इन्स्टिट्यूट) यांनी सांगितले की, या सहकार्यातून बेळगावात रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शस्त्रक्रिया पद्धती उपलब्ध होणार आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे उपचार जलद होतील व रुग्णांना लवकर बरे वाटेल.

यावेळी डॉ. श्रीनिवास जोशी यांनी मधुमेहींनी डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी, असे सांगितले. तर डॉ. सत्यमूर्ती यांनी कमी वयात मुलांमध्ये वाढणाऱ्या दृष्टीदोषाबाबत चिंता व्यक्त केली. दोन्ही संस्थांच्या सहकार्यातून भारत चष्मामुक्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

या उपक्रमाचा शुभारंभ ५ ऑक्टोबर रोजी काकती येथील बुधवार हॉटेलमध्ये होणार असून, या वेळी ९१ वर्षीय ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. एम. एम. जोशी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या प्रसंगी कीर्ती नेर्लेकर (संचालक) व राजेंद्र बेळगावकर (आर्थिक सल्लागार) हे देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी कुडकणीज आय सेंटरचे संचालक कीर्ती नेर्लेकर आणि आर्थिक सल्लागार राजेंद्र बेळगावकर ही उपस्थित होते.