उचगाव / वार्ताहर

उचगाव येथे रविवारी दि. १८ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित २५ व्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजीत देशमुख यावर्षी उपस्थित राहणार आहेत. उचगाव मराठी साहित्य अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी नुकतीच त्यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले आहे. त्यांनी या निमंत्रणाचा स्वीकार करून ते या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. असे उचगाव मराठी साहित्य अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर यांनी ही माहिती दिली आहे.

बेळगाव सह चंदगड ,खानापूर व निपाणी तालुका आणि परिसरातील साहित्य रसिकांना उचगाव साहित्य संमेलना बाबत नेहमीच उत्सुकता लागू राहिली आसते. आता संमेलन चार दिवसांवर येऊन पोहोचले असून आयोजकांनी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी कंबर कसली असून, संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. परिसरात आणि आता सर्वत्र संमेलनाची चर्चा सुरू आहे. रविवार दि. १८ जानेवारी रोजी होणाऱ्या या संमेलनाच्या तयारीला वेगा आला असून कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे .संमेलनाच्या आयोजनामध्ये कोणतीही कसर राहू नये म्हणून याची दक्षता घेण्यात येत आहे. त्यासाठी जाहिरात व जनसंपर्क कार्यक्रम, निधी,स्वागत मंडप, सजावट व अन्य व्यवस्था, ग्रंथ दिंडी, सांस्कृतिक, आरोग्य माहिती व प्रसारण,भोजन,अधि समित्यांची रचना करण्यात आली आहे. सर्व समित्या, समित्यांचे पदाधिकारी आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. ग्रंथदिंडीसाठी वारकरी, भजनी मंडळ ,लेझीम पथक, झांज पथक, ढोल ताशा पथक यांना निमंत्रण देण्यात आले असून, त्यांची तयारी सुरू करण्यात आली आहे. ग्रंथ दिंडीत सहभागी होण्यासाठी परिसरातील शाळा व महाविद्यालये तसेच सर्व युवक मंडळांना कळविण्यात आले आहे. संमेलनातील साहित्यिक कार्यक्रमांची उंची दरवर्षी वाढत चालल्याने परिसरात एक आगळे वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. सारा गाव संमेलनाच्या यशस्वीतेसाठी कामाला लागला आहे .

अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर, उपाध्यक्ष कृष्णाजी कदम पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब देसाई,सेक्रेटरी एन.ओ चौगुले यासह बी.एस होनगेकर, अशोक हुक्केरीकर, बबन देसाई, विनोद होनगेकर, संदीप होनगेकर, किसन लाळगे अंकूश पाटील सर्व कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना करत आहेत. बेळगावच्या या परिसरात होणाऱ्या या संमेलनासाठी भव्य शामियाण्याची उभारणी करण्यासंदर्भात ही चर्चा करण्यात आली असून बेळगाव वेंगुर्ले रोडवरील अप्रोच रोड पासून ते संमेलन स्थळापर्यंत स्वागत कमानी या संदर्भात ही सभामंडप उभारणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना सूचना करण्यात आल्या आहेत.
गावातील प्राथमिक मराठी शाळा, मळेकरणी हायस्कूल, स्वामी विवेकानंद हायस्कूल मधील विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग या संमेलनामध्ये असतो या संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गाला कवी, लेखक जवळून पाहता येतात. त्यांचे विचार ऐकायला मिळतात. यासाठी दरवर्षी विद्यार्थी वर्गाला सामावून घेऊन त्यांचे विचार ऐकण्याची संधी दिली जाते.परिणामी गेल्या २४ वर्षांमध्ये मुले मुली कविता करू लागले आहेत. शाळेत दिलेल्या विषयावर लेख, निबंध लिहिण्यात त्यांना सोपे झाले जात आहे. हे तर संमेलनाचे खरे फलित आहे असे मनोगत या भागातील अनेक पालक व ग्रामस्थातून व्यक्त होताना दिसत आहे .

वाचन संस्कृती वाढावी म्हणून संमेलनात येणारे पालक, शिक्षक, विद्यार्थी व साहित्य प्रेमी यांनी एक तरी पुस्तक खरेदी करावे या उद्देशाने अकादमी गेली २४ वर्षे सातत्याने पुस्तक प्रदर्शन भरवत आहे. यावर्षीही प्रकाशकांना निमंत्रण देण्यात येत आहेत.

एकंदरीत या भागात उचगाव साहित्य संमेलनाचा दबदबा सुरू असून सर्वांच्या आता नजरा १८ जानेवारीच्या संमेलनाकडे लागून राहिले आहेत.