- फरार टिप्पर चालकाला अटक
- खानापूर रोडवर भीषण अपघात
बेळगाव / प्रतिनिधी
शहर स्वच्छतेसाठी पहाटेपासून रस्त्यावर काम करणाऱ्या महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्याच्या भरधाव टिप्परच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी खानापूर रोडवर ही दुर्दैवी घटना घडली. अवक्का कोलकार (वय ५०) असे या अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान या घटनेनंतर पसार झालेल्या टिप्पर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, मृत अवक्का नेहमीप्रमाणे शनिवारी पहाटे रस्त्यावर स्वच्छतेचे काम करत होत्या. यावेळी बेळगाव शहराकडून भरधाव वेगाने आलेल्या एका टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेनंतर परिसरात परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची नोंद बेळगाव दक्षिण वाहतूक पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. कर्तव्यावर असताना एका कर्मचाऱ्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.








