बेळगाव / प्रतिनिधी

तिळगुळाच्या गोडव्याने, परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम साधत बेळगाव शहर व परिसरात मकरसंक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. एकमेकांना तिळगुळाची देवाण-घेवाण, लज्जतदार खाद्यपदार्थांचा आस्वाद आणि सोशल मीडियावरील शुभेच्छांच्या वर्षावाने संक्रांतीचा आनंद द्विगुणित झाला.

शहरातील अनेक देवस्थानांमध्ये देवांच्या मूर्तींना तिळगुळाचे दागिने व अलंकार घालून आकर्षक सजावट करण्यात आली होती. दक्षिण काशी श्री कपिलेश्वर देवस्थान तसेच नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानात जोतिबा देवाला तिळगुळाचा पोशाख व दागिने अर्पण करण्यात आले. भोगी दिवशी नैवेद्य, तर मकरसंक्रांतीदिवशी अभिषेक करून विशेष पूजा करण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

भोगीच्या निमित्ताने घरोघरी भाकरी, चटण्या व विविध भाज्यांची देवाण-घेवाण झाली. सुवासिनी महिलांनी वाण देत सण साजरा केला. बाजारपेठेत तिळगूळ, भाकरी, चटण्या आणि इतर पारंपरिक पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. चौकाचौकांबरोबरच उपनगरांमध्येही तिळगुळाची रेलचेल दिसून आली.

बालचमूपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ असा संदेश देत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. पहाटेपासूनच सोशल मीडियावर भोगी व मकरसंक्रांतीच्या शुभेच्छांचा पाऊस पडत होता. गोडवा, आपुलकी आणि आनंद यांचे प्रतीक असलेली संक्रांत बेळगावकरांनी पारंपरिक उत्साहात साजरी केली.