• गोव्यातील सराईत चोरटा अटकेत ; १३.५० लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

बेळगाव / प्रतिनिधी

शांतीनगर, टिळकवाडी आणि चिदंबरनगर परिसरात झालेल्या चोऱ्या व घरफोडी प्रकरणांचा छडा लावत टिळकवाडी पोलिसांनी गोव्यात राहणाऱ्या एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १३ लाख ५० हजार रुपये किमतीचे सुमारे ११५ ग्रॅम सोन्याचे दागिने, दुचाकी आणि मोबाईल असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जमशेदखान खलिलखान (वय ४१) असे असून तो मूळचा हैदराबाद (तेलंगणा) येथील रहिवासी असून सध्या गोव्यात वास्तव्यास होता. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे आणि उपायुक्त नारायण बरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

खडेबाजार विभागाचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या नेतृत्वाखाली टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने तपास सुरू केला होता. चौकशीत आरोपीने टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत दोन तर उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या हद्दीत एक अशी तीन चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. चोरीनंतर त्याने सोन्याचे दागिने वितळवून ठेवले असल्याचेही तपासात उघड झाले.

पोलिसांनी आरोपीकडून ६० ग्रॅम व ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने, केए-२२ ईके ३०७७ क्रमांकाची होंडा अॅक्टिव्हा दुचाकी आणि मोबाईल जप्त केला आहे. या कारवाईत टिळकवाडी पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास सुरू असून इतर गुन्ह्यांशी आरोपीचा संबंध आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.