• अमन नगर येथील घटना

बेळगाव / प्रतिनिधी

थंडीपासून संरक्षण करण्यासाठी पेटवलेल्या कोळशाच्या शेगडीमुळे खोलीतील ऑक्सिजन कमी होऊन श्वास गुदमरल्याने तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी बेळगाव शहरातील अमननगरात ही हृदयद्रावक घटना घडली.

बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, चार भावंडे एका खोलीत राहत होती. थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांनी खोलीत कोळशाची शेगडी पेटवली होती आणि खिडक्या व दरवाजे पूर्णपणे बंद केले होते. शेगडीतून बाहेर पडणाऱ्या कार्बन मोनोऑक्साइड विषारी वायूमुळे तीन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता आहे, तर चौथा जखमी असून त्याच्यावर बीम्स इस्पितळात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव शहरात सध्या कडाक्याची थंडी सुरू आहे, ज्यामुळे अनेक ठिकाणी लोकांनी थंडीपासून वाचण्यासाठी शेकोट्या पेटवल्या आहेत. मात्र, अमन नगर परिसरातील तरुणांनी खोलीत शेगडी लावून झोप घेतली होती. खिडक्या व दरवाजे बंद असल्याने खोलीत मोठ्या प्रमाणावर धूर साचून ऑक्सिजनचा अभाव निर्माण झाला आणि तिघांचे दुर्दैवाने प्राण गेले.या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून माळमारुती पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. प्राथमिक माहितीनुसार मृत तरुण एकाच खोलीत राहत असल्याची पुष्टी झाली असून, पोलीस चौकशीमधून ऑक्सिजन कमी झाल्यामुळे गुदमरून मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरु केला आहे. अद्याप मृत तरुणांची ओळख अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही.