- सौंदत्ती तालुक्याच्या हुलीकट्टी गावात घडली होती घटना
सौंदत्ती / वार्ताहर
सौंदत्ती तालुक्याच्या हुलीकट्टी गावातील एका शाळेचे मुख्याध्यापक मुस्लिम असल्याने त्यांना नोकरी सोडण्यास भाग पाडण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक शाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीत कीटकनाशक टाकलेल्या तिघांना सौंदत्ती पोलिसांनी अटक केली आहे. सागर पाटील, कृष्णा मादार आणि नागनगौडा पाटील अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सौंदत्ती पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले, हुलिकट्टी गावातील सरकारी उच्च प्राथमिक शाळेत ४१ मुले शिकतात. सदर शाळेत सुलेमान गोरीनायक मुख्याध्यापकपदी कार्यरत आहेत. त्यांना नोकरी सोडण्यास भाग पाडण्याकरिता सागर पाटील नावाच्या एका ग्रामस्थाने कृष्णा मदारकडून कीटकनाशक मिळवले होते आणि ते शाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीत मिसळले होते. दि. १४ जुलै रोजी कीटकनाशक मिश्रित पाणी पिल्यानंतर, अत्यवस्थ झालेल्या ११ मुलांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करून उपचार देण्यात आले होते.