- कर्णधारपदाच्या वादावर मंत्री सतीश जारकीहोळी यांची प्रतिक्रिया
- मुख्यमंत्री सिद्धरामय्या – उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यावर सूचक टीका
बेळगाव / प्रतिनिधी
कर्णधारपदासाठी पुढे येणारी नावे ही त्या दोघांचीच होती. त्यांनीच निर्णय घेतला असल्याने आम्हाला यावर काहीही भाष्य करायचे नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
शहरातील पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी संयुक्तपणे कर्णधारपदासाठी टॉस टाकला होता. तो टॉस हेड होता की टेल, तसेच त्याबाबत हायकमांडने काय सूचना दिल्या, हे त्या दोघांनाच विचारले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, हा टॉस दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर झाला होता. कर्णधारपदातील बदल किंवा जुन्या कर्णधाराच्या सातत्याबाबतचे सर्व निर्णय त्यांनीच घेतले आहेत. त्यामुळे यावर इतरांनी बोलण्याची गरज नाही.
डी. के. शिवकुमार यांना हायकमांडने दिल्लीला बोलावल्याबाबतही आम्हाला काही सांगायचे नाही. आम्ही सध्या कर्णधारपदावर नाही, त्यामुळे या विषयावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही, असेही जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
शेवटी त्यांनी उपरोधात्मक शैलीत सांगितले की, कर्णधारपदासाठी टॉस टाकताना कोणताही तिसरा पंच नव्हता. त्यामुळे त्या टॉसबाबत संपूर्ण माहिती त्या दोघांनाच आहे आणि यासंबंधी प्रश्नही त्यांनाच विचारले पाहिजेत.








