- जलतरणात पाच पदकांची कमाई ; बेळगावची मान उंचावली
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावच्या हलकारे भगिनींनी नवी दिल्ली येथे १२ ते १७ डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या ६९व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शहराची मान उंचावली आहे. सुहास आणि सुषमा हलकारे यांच्या कन्या सुनीधी हलकारे आणि समृद्धी हलकारे यांनी जलतरण स्पर्धांमध्ये एकूण पाच पदके पटकावत आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली. यामध्ये २ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य पदकांचा समावेश आहे.
स्पर्धेतील सर्वात लक्षवेधी क्षण २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात पाहायला मिळाला. या शर्यतीत समृद्धी हलकारेने १७ वर्षांखालील गटात सुवर्णपदक पटकावले, तर सुनीधी हलकारेने १९ वर्षांखालील गटात रौप्यपदक जिंकले. वेगवेगळ्या वयोगटात दोन्ही बहिणींनी पोडियमवर स्थान मिळवत आपली छाप पाडली.
राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत पदक मिळवण्याची ही हलकारे भगिनींची सलग तिसरी कामगिरी ठरली आहे. यापूर्वीही त्यांनी बिहारमधील गया येथे झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे.
या दोन्ही जलतरणपटू बेळगाव स्विमर्स क्लब तसेच के.एल.ई. संस्थेच्या ऑलिम्पिक आकाराच्या सुवर्ण जेएनएमसी तलावातील अॅक्वेरियस स्विम क्लब येथे नियमित सराव करतात. त्यांना प्रशिक्षक उमेश कळघटगी आणि त्यांच्या समर्पित सहाय्यक संघाकडून मार्गदर्शन मिळत आहे.








