बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावच्या अनगोळ येथील संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींचा फुटबॉल संघ रांची (झारखंड) येथे होणाऱ्या ६९ व्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना झाला आहे.

हरियाणात नुकत्याच पार पडलेल्या ३६ व्या अखिल भारतीय विद्याभारती फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षे व १७ वर्षांखालील मुलींच्या गटात संत मीरा शाळेच्या संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले होते. या यशाच्या जोरावर हा संघ आता १८ ते २२ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत विद्याभारतीचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या पार्श्वभूमीवर माधव सभागृहात आयोजित कार्यक्रमात वेगा हेल्मेट ग्रुपचे वरिष्ठ व्यवस्थापक शिवाप्पा बिडी आणि सहाय्यक व्यवस्थापक श्वेता पवार यांच्याहस्ते खेळाडूंना फुटबॉल किट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी आणि मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार यांनीही संघाच्या यशासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

क्रीडा शिक्षक चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संत मीरा शाळेचा हा मुलींचा संघ राष्ट्रीय स्तरावर बेळगावचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.