येळ्ळूर दि. ११ वार्ताहर : नवहिंद एज्युकेशन सोसायटी, अनगोळ येथील दिलीप दामले हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांचे उद्घाटन मान्यवर यशोधर जैन यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार ए. एल. गुरव होते.

प्रारंभी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पदसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. खेळाडू धनश्री लोहार हिने क्रीडाज्योत मान्यवरांकडे सुपूर्द केली, तर गायत्री कांबळे हिने खेळाडूंना क्रीडाशपथ दिली.

अध्यक्षीय भाषणात ए. एल. गुरव यांनी खेळांचे महत्त्व विशद करताना सांगितले की, खेळांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. निर्णयक्षमता, शिस्त, सहकार्य व सहानुभूतीची भावना खेळांमधून विकसित होते. शारीरिक विकासाबरोबरच मानसिक विकासही होत असल्याने विद्यार्थी भविष्यातील कोणत्याही आव्हानांना समर्थपणे सामोरे जाऊ शकतात.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक एच. बी. पाटील यांनी केले. सूत्रसंचलन शामल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन माधुरी कुगजी यांनी केले. याप्रसंगी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.