सौंदत्ती / वार्ताहर
कंडक्टर पत्नीचा निर्घृण खून करून फरार झालेल्या पोलीस शिपायाला अटक करण्यात अखेर बेळगाव पोलिसांनी यश मिळवले आहे. या प्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.
सौंदत्ती येथे बस कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या काशव्वा कांबळे यांचा काही दिवसांपूर्वी त्यांच्या पतीने, पोलीस शिपाई संतोष कांबळे याने खून केला होता. घटस्फोटानंतरही संतोष तिचा पाठलाग करत असल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर तो फरार झाला होता.
डॉ. गुळेद यांनी सांगितले की, “या प्रकरणी याआधीच संतोष कांबळे याच्यावर हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर त्याला निलंबित करून सेवेतून काढून टाकण्यात आले होते. तरीदेखील त्याने रागाच्या भरात माजी पत्नीचा खून केला. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपीला अटक केली आहे.”
या अटकेनंतर संपूर्ण सौंदत्ती परिसरात दिलासा व्यक्त होत असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

