- तालुका म. ए. समितीचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्याच्या विविध भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून येत्या दि. २३ ऑगस्ट पूर्वी गणेशोत्सवा अगोदर रस्ते दुरुस्ती करण्यात यावी अशी जोरदार मागणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे करण्यात आली, अन्यथा रास्तारोको आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
मे व जून महिन्यात झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे बेळगाव – वेंगुर्ला रस्ता, उचगाव – बेकिनकेरे रस्ता, मच्छे – संती बस्तवाड रस्ता, वाघवडे गावाचा मुख्य रस्ता तसेच तालुक्यातील इतर रस्त्यांची संपूर्णतः चाळण झाली आहे.
या खराब रस्त्यामुळे नागरिक विशेषतः ग्रामस्थांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सव तोंडावर असताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतुकीच्या अडचणी टाळण्यासाठी रस्ते दुरुस्ती अत्यावश्यक आहे. येत्या २३ ऑगस्ट पूर्वी या रस्ताच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात न केल्यास नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, माजी आमदार मनोहर किणेकर, रामचंद्र मोदगेकर, अनिल पाटील, लक्ष्मण होनगेकर, आर.के. पाटील, नारायण सावगावकर यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की, “बाची वेंगुर्ला रस्त्याची अवस्था खूप खराब झाली आहे आणि गेल्या वर्षभरापासून तो दुरुस्त करण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे. गणेशोत्सवापूर्वी किमान खड्डे बुजवून तात्पुरती दुरुस्ती तरी करावी.” तसेच, “बेळगाव ग्रामीण मतदारसंघाला बारामती बनवण्याची भाषा करणाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे,” असेही ते म्हणाले.
यावेळी आर. एम. चौगुले म्हणाले की, “बेळगाव तालुक्यातील रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. गणेशोत्सवापूर्वी हे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी करत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत, कंत्राटदाराला फोन करून दुरुस्ती सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.” ते म्हणाले की, “बाची- वेंगुर्ला रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शासनाचे याकडे लक्ष वेधले असून, सरकारने निधीही मंजूर केला आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचे रस्ते बांधावेत. अन्यथा, १० दिवसांनंतर पुन्हा आंदोलन करू” असा इशारा त्यांनी दिला.