बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात बेकायदेशीर सट्टा आणि शस्त्रसंबंधित कारवायांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली. एकाच दिवशी १० मटका खेळणाऱ्यांसह एका व्यक्तीला घातक शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत सहा वेगवेगळ्या गुन्ह्यांचा समावेश असून, एकूण ११,४०० रुपये रोख, मटका तिकिटे आणि एक ड्रॅगन चाकू जप्त करण्यात आला.
२५/११/२०२५ रोजी पीएसआय शशिकुमार कुरळे यांच्या पथकाने खंजर गल्ली येथे छापा टाकून हिराब्बास मोहम्मद रफिक शेख, प्रशांत व्यंकटेश रेवणकर आणि फहीम जिलानी कोतवाल यांना ‘मैं रतन मुंबई’ सट्टा खेळत असल्याच्या आरोपात अटक केली. यांच्याकडून ४,४५० रुपये रोख आणि तिकिटे जप्त केली गेली.
त्याच दिवशी, पीएसआय विठ्ठल हवन्नावर यांच्या पथकाने जुन्या भाजी मार्केटजवळ छापा टाकून सुनील सदावर, शमशेर पिरजादे आणि गजानन गरडा यांना ‘मैं रतन मुंबई’ मटका खेळत असल्याच्या आरोपात ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ३,२०० रुपये रोख जप्त करण्यात आले.
तपासादरम्यान, समर्थ नगरकडे जाणाऱ्या नाल्याजवळ पीएसआय विठ्ठल हवन्नावर आणि त्याच्या पथकाने विनायक शंकर प्रधान याला अटक केली आणि त्याच्याकडून एक धारदार चाकू जप्त केला.
याशिवाय, एपीएमसी पोलिसांनी एपीएमसी मार्केट यार्ड गेटजवळ छापा टाकून ‘कल्याण मटका’ चालवणाऱ्या विनायक विजेशकुमार मादर यांच्याकडून ७०० रुपये रोख जप्त केले. तसेच, कोस्टल गिल हॉटेलजवळ मोहन किल्लेकर यांच्याकडून ८०० रुपये रोख आणि तिकिटे जप्त करण्यात आल्या. वडगाव येथील कलमेश्वर रोडवर गणपती मंदिराजवळ किशन पाटील यांच्याकडून २,२५० रुपये रोख जप्त करण्यात आले.
या कारवाईत एकूण १० जणांना अटक करण्यात आली असून, ६ प्रकरणांमध्ये तपास सुरू आहे. बेळगाव शहराचे पोलिस आयुक्त आणि डीसीपी यांनी ही यशस्वी कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.








