बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी अनपेक्षित घटना घडली. शहरातील मेणसे गल्ली परिसरातील एका अपंग व्यापाऱ्याने महापालिकेकडे थेट तक्रार करून, अपंग असूनही त्याच्याकडून रोज भू-भाडे (कर) वसूल केला जात असल्याचे सांगितले. यावरून उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

महापालिकेच्या नियमांनुसार अपंग व्यापाऱ्यांकडून कर वसूल न करण्याची तरतूद आहे. तरीदेखील खासगी कर वसुली कंत्राटदार अपंग व्यापाऱ्यांकडून दररोज रु. २० कर वसूल करीत असल्याची तक्रार व्यापारी मारुती कारेगार यांनी सभागृहात केली. “मी अपंग आहे, दिवसाला १०० ते २०० रुपये मिळवतो. त्यावरही कर कसा भरू?” असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

तक्रार समजताच महापौर मंगेश पवार, आमदार आसिफ सेठ आणि विधान परिषदेचे सदस्य बैठकीतूनच बाहेर पडले आणि संबंधित व्यापाऱ्याची समस्या प्रत्यक्ष ऐकली. या प्रकरणी आमदार सेठ म्हणाले, “अशा तक्रारी अनेकदा आल्या असून अधिकाऱ्यांना पूर्वीही सूचना केल्या आहेत. गरीब अपंगांकडून कर कसा वसूल करू शकता?”त्यांनी तातडीने कर वसुली धोरणात अपंगांसाठी शिथिलता आणण्याचा सल्ला दिला.

यावेळी महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी सांगितले की,“अशा तक्रारीनंतर कर वसुली करणाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. अपंगांकडून कर वसूल करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.”

महापौरांनीही कर संकलन समितीसोबत चर्चा करून तत्काळ योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.