कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे बेळवट्टी हायस्कूलच्या गुणवंत कब्बडी खेळाडूंचा दीपावलीच्या शुभदिनी सन्मान करण्यात आला. बेळवट्टी हायस्कूलच्या चौदा वर्षांखालील मुलींचा कब्बडी संघ बेळगाव जिल्ह्यात अव्वल ठरला. विभागीय स्तरावर दमदार धडक मारुन बेळगाव पश्चिम भागांत आपला नावलौकिक वाढविला आहे. बेळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून नारीशक्ती खेळात गरुड झेप घेऊ शकते हे सिद्ध केले आहे. याचा सार्थ अभिमान कावळेवाडी महात्मा गांधी संस्थेला वाटतो. अशा गुणी खेळाडूंना प्रोत्साहन, प्रेरणा देण्याचे आदर्श कार्य ही संस्था गेली आठ वर्षे सातत्याने करीत आहे.

बेळवट्टी गावातील या खेळाडूंना भविष्यात आपले करिअर निर्माण करता यावे यासाठी कावळेवाडी येथे मान्यवरांच्याहस्ते मानाचा फेटा, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. त्यांचे क्रीडाशिक्षक अजय गाडेकर यांचाही यावेळी शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. कु. दर्शना द. पाटील (कर्णधार), श्रृतिका सं. नाकाडी, देवयानी उ. सूर्यवंशी, लता र. पाटील, मधुरा र. सुतार, रिया र.पाटील, सलोनी श्री.दळवी, गौरी चं.चौगले, समीक्षा वि. नलावडे, मनाली र. चौगले, आचल र.कांबळे, सविता वि. नलावडे या कब्बडीपट्टुना विभागीय स्तरावर विजय प्राप्त होऊन राज्यस्तरावर निवड व्हावी यासाठी हा शुभेच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जोतिबा मोरे होते. प्रमुख अतिथी म्हणून यल्लापा बेळगावकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर,अणवेकर फाऊंडेशन बेळगावचे सूरज ना.आणवेकर तसेच शिवाजी जाधव, कल्लापा येळ्ळूरकर, रघुनाथ मोरे, लक्ष्मण जाधव, पांडुरंग मोरे, यल्लापा गावडे,एम.पी मोरे, यशवंत बा. चांदीलकर, सौ.आशा बाचीकर, रेणुका मोरे, प्रभा गावडे, श्रावणी शं.गावडे, आण्णापा अष्टेकर, राजू बुरुड, अर्जुन सुतार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रास्ताविक व स्वागत वाय. पी. नाईक यांनी केले. श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली व संत‌ तुकाराम महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी सामाजिक संस्थेकडून या कब्बडी संघाला रू. ५००१/-, यल्लापा बेळगावकर यांच्या कडून रू. ११००/- श्री. प्रताप अष्टेकर (कोल्हापूर) यांच्याकडून रू. १००१/- आर्थिक सहकार्य करुन कौतुकाची थाप दिली. तसेच विक्रम रा.भोगण व देवेंद्र गो.चौगले यांनी टी शर्ट दिली.आज ग्रामीण भागातील खेळाडू जिद्द चिकाटीने अभ्यासाबरोबरच खेळातही नावलौकिक मिळविण्यासाठी कोणत्याही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नसताना शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व पालकांच्या सहकार्याने पुढे जात आहेत हे अभिमानास्पद आहे. विभागीय स्तरावर खेळण्यासाठी बागलकोट येथे बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. हा शुभेच्छा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.