• राज्य स्वीप नोडल अधिकारी पी. एस. वस्त्रद

बेळगाव / प्रतिनिधी

मतदार यादीच्या विशेष पुनरावृत्ती दरम्यान स्वीप उपक्रमांचे महत्त्वपूर्ण योगदान असून, या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक असल्याचे राज्य स्वीप नोडल अधिकारी पी. एस. वस्त्रद यांनी सांगितले.

सोमवारी (२७ ऑक्टोबर) जिल्हा पंचायत कार्यालयात एसआयआर/एसएसआर तयारी, स्वीप आणि निवडणुकीविषयक आयोजित विशेष व्यापक पुनरावृत्ती बैठकीत ते बोलत होते.

बैठकीदरम्यान वस्त्रद यांनी अधिकाऱ्यांना मतदार यादी पुनरावृत्तीचे उद्दिष्ट आणि प्रक्रिया समजावून सांगितली. तसेच प्रत्येक टप्प्यावर जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी बॅनर,पत्रके,जनजागृती कार्यक्रम आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले.

जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी राज्य नोडल अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील स्वीप उपक्रम आणि निवडणुक केंद्र असलेल्या शाळा व महाविद्यालयांची माहिती सादर केली.

या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, ग्रा. पं. प्रकल्प संचालक रवी एन. बांगरेप्पनवर, महापालिका उपायुक्त रेश्मा तालिकोटी व उदयकुमार बी. टी., डीडीपीयू एम. एम. कांबळे, जिल्हा पीयू नोडल अधिकारी एम. ए. मुल्ला, डीडीपीआय लीलावती हिरेमठ, डीएचओ डॉ. आय. पी. गडाद तसेच इतर जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधी उपस्थित होते.