- सासरच्यांवर गंभीर आरोप
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील कलखांब येथे एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणीच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्यांवर तिच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
संतिबस्तवाड येथील शीतल हिचा विवाह कलखांब गावातील राजू नायक यांच्याशी झाला होता. या दाम्पत्याला अडीच वर्षांचे व सहा महिन्यांचे दोन लहान मुले आहेत. मात्र, शीतलचा पती तिच्या चारित्र्यावर शंका घेत असल्याने घरात वारंवार वाद होत असल्याचे माहेरच्यांनी सांगितले. काल सकाळी नेहमीप्रमाणे संवाद झाल्यानंतर रात्री ती मृतावस्थेत आढळली. विशेष म्हणजे, घटनेनंतर सासरचे सर्व लोक घर सोडून पसार झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
मृत शीतलची बहीण ईरव्वा यांनी सांगितले की, “सकाळी शीतलशी बोललो तेव्हा सगळे ठीक होते. मात्र तिचा पती कायम संशय घेत असे. आम्ही यापूर्वीही त्यांना समजावून सांगितले होते. आज जेव्हा तिला रुग्णालयात दाखल केले, तेव्हा सासरचे कोणीही उपस्थित नव्हते. जर त्यांचा काही संबंध नसेल, तर ते लपले का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शीतलचे नातेवाईक शंकर दुर्गप्पा अंकलगी यांनी सांगितले की, “रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक फोन आला आणि शीतलच्या मृत्यूची माहिती मिळाली. घरात कोणीही नव्हते, तिचा मृतदेह एकटाच सोडला होता. सासरच्यांनीच मारहाण करून तिचा जीव घेतला असावा,” असा संशय त्यांनी व्यक्त केला. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहासमोर कुटुंबीयांचा आक्रोश पाहायला मिळाला.







