- महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार
मुंबई : अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदावर सुनेत्रा पवार यांची शनिवारी निवड होणार आहे. निवडीनंतर तात्काळ त्यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडण्याची शक्यता असून, त्यामुळे महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी शनिवारी आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची एकमताने विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार असल्याची माहिती आहे. निवडीनंतर लगेचच त्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असून, शपथविधीचा कार्यक्रम साध्या पद्धतीने पार पाडला जाणार आहे. सायंकाळी सुमारे पाच वाजता शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत पक्षाच्या वतीने सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार असल्याची अधिकृत माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. शनिवारी दुपारी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर निवडीचे पत्र तातडीने मुख्यमंत्र्यांकडे सादर केले जाणार असल्याचे समजते.
सुनेत्रा पवार यांचा शपथविधी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार पार पडणार आहे. त्यामुळे वेळापत्रक अंतिम स्वरूपात ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
याचबरोबर, अजित पवार यांच्याकडे असलेली वित्त व नियोजन तसेच उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडेच कायम राहावीत, अशी अपेक्षा पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करण्यात आल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली आहे.








